आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

राष्ट्रपिता महात्मा गांधींचे विचार विद्यार्थ्यांनी आत्मसात करावेत -प्रा. विजयकुमार पाटील!

देवचंद महाविद्यालय, अर्जुननगर येथे 'महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती' साजरी!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (2)अर्जुननगर 

देवचंद महाविद्यालय, अर्जुननगर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती’ निमित्ताने महात्मा गांधींच्या प्रतिमेचे पूजन, श्रमदान – परिसर स्वच्छता, स्वच्छता पोस्टर व घोषवाक्य स्पर्धेतील विद्यार्थ्यांना पारितोषक वितरण आणि ‘महात्मा गांधींचे विचार समजून घेताना’ या विषयावर वक्ते प्रा. विजयकुमार पाटील – समाजशास्त्र विभागप्रमुख यांचे व्याख्यान, अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पर्यवेक्षक डॉ. ए. एस. डोणर यांनी भूषविले.

‘महात्मा गांधींचे विचार समजून घेताना’ या विषयावर मार्गदर्शन करताना प्रा. विजयकुमार पाटील यांनी, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबर रोजी सर्व भारतीय आदर- सन्मानाने साजरी करतात. सामाजिक आणि राजकीय परिवर्तनासाठी अहिंसा, सविनय कायदेभंग व सत्याग्रह ही तत्त्वे सामर्थ्यवान साधने म्हणून वापरणाऱ्या महात्मा गांधीजींना आजच्या काळात कृतज्ञता व्यक्त केली जाते. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. ‘अहिंसा हे दुर्बलांचे नाही तर बलवानांचे शस्त्र आहे’, अशी शिकवण समाजाला देताना याच अहिंसा शस्त्राच्या मार्गाने इंग्रजांच्या विरुद्ध क्रांती घडवून आणली. कोणताही रक्तपात न होता क्रांती घडवणारे अलौकिक व्यक्तिमत्त्व म्हणून संपूर्ण जग गांधीजींच्या विचारांनी आजही भारावून गेले आहे. चांगल्या बदलाची सुरूवात आधी स्वत:पासून करा.सत्य आणि अहिंसा हाच माझा धर्म आहे. सत्य हा माझा देव आहे आणि अहिंसा ही त्या देवाची आराधना आहे. ही शिकवण त्यांच्या कार्यातून समाजात रूजली. अहिंसेबद्दलची त्यांची वचनबद्धता लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रांनी २ ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून घोषित केला आहे. मानवी जीवनातील स्वच्छतेचे महत्त्व लोकांना कळण्यासाठी त्यांनी स्वतः त्या तत्वांचा अंगीकार केला. सत्य,अहिंसा, सत्याग्रह या मूल्यांचे महत्त्व सांगताना महात्मा गांधी म्हणत, ‘आधी ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील, नंतर तुमच्यावर हसतील, नंतर भांडतीलही; पण सरतेशेवटी विजय तुमचाच असेल’. भारतीय समाजामध्ये श्रमसंस्कृतीचे महत्त्व, स्वच्छता, राष्ट्रभक्ती, सामाजिक बांधिलकी इत्यादी मूल्ये रुजविण्यासाठी प्रयत्न केले. महात्मा गांधींनी ‘माझे सत्याचे प्रयोग’ या आत्मचरित्रात जीवनानुभव व्यक्त केले आहेत. आज जगात सर्वात जास्त वाचले जाणारे दुसरे पुस्तक म्हणून या आत्मचरित्राकडे पाहिले जाते. महात्मा गांधी हे केवळ एक व्यक्ती नसून ती विचारधारा आहे. जी आजही लोकप्रिय आहे. त्यांच्या कार्याचा अभ्यास करून अनेक महान नेते, तत्वज्ञ, समाजकारणी जगात घडले जात आहेत. जगातील विविध देशांत, विविध भाषेतील लाखों पुस्तकांतून महात्मा गांधींच्या कार्याचा शोध घेतला जात आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये थोर विचारवंतांचे विचार आत्मसात करावेत, असे प्रतिपादन प्रा. पाटील यांनी केले.

आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये देवचंद महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. डॉ. ए.एस. डोणर यांनी महात्मा गांधीच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला. आपल्या देशाची ओळख ग्रामीण संस्कृती आहे. आपला देश कृषीप्रधान असून ‘खेड्याकडे चला’ हा संदेश महात्मा गांधीनी अनेक वर्षांपूर्वी दिला, त्याचे महत्त्व आजच्या काळात युवकांनी ओळखले पाहिजे. श्रममूल्य जाणणारा शेतकरी हा आपल्या शेताचा राजा आहे, जगाचा पोशिंदा आहे. स्वच्छता, सत्य या मूल्यांची जोपासना स्वतःपासून करावी. महात्मा गांधींच्या प्रेरणादायी विचारांचे पालन करून विद्यार्थी आयुष्यात यश मिळवू शकतात. चांगल्या बदलाची सुरूवात आधी स्वत:पासून करा. इतरांना मदत करणे हा मानवी जीवनाचा उद्देश आहे, असा संदेश दिला. तसेच लालबहादूर शास्त्री जयंती दरवर्षी 2 ऑक्टोबरला साजरी केली जाते, ज्यादिवशी भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा जन्म झाला होता. शास्त्रीजींची साधी जीवनशैली आणि प्रामाणिकपणा त्यांची ओळख होती. ‘जय जवान, जय किसान’ हा त्यांचा मंत्र भारताच्या प्रगतीसाठी महत्त्वाचा ठरला. शास्त्रीजींनी 1965 साली भारत-पाकिस्तान युद्धाच्या काळात देशाचे नेतृत्व केले आणि आपला दृढ निर्धार दाखवला. त्यांच्या जयंती निमित्ताने देशभरात त्यांच्या कार्याचा सन्मान केला जातो आणि त्यांच्या नेतृत्वगुणांची प्रेरणा घेतली जाते.

राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत महात्मा गांधीं जयंती निमित्त महाविद्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. ‘स्वच्छता ही सेवा २०२४’ या उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या ‘पोस्टर प्रदर्शन व घोषवाक्य स्पर्धेत विजेते – पोस्टर प्रदर्शन प्रथम क्रमांक – ऋग्वेद दावणे, द्वितीय क्रमांक – कु. प्रणाली सुर्यवंशी, तृतीय क्रमांक-कु.मधुरा कुंभार, तसेच घोषवाक्य प्रथम क्रमांक – कु. पूजा खोत, द्वितीय क्रमांक – कु. प्रियांका भोसले, तृतीय क्रमांक- कु. मुस्कान सय्यद आदी स्वयंसेवकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

या कार्यक्रमासाठी मा. आशिषभाई शाह अध्यक्ष,जनता शिक्षण मंडळ, अर्जुननगर यांची प्रेरणा मिळाली. मा. प्रोफे. डॉ. जी. डी. इंगळे प्राचार्या, प्रा.सौ.एस.पी.जाधव उप प्राचार्या, देवचंद महाविद्यालय यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. व्ही. पी. पाटील, रासेयो कार्यक्रम अधिकारी यांनी, आभार प्रा.बी.एस.कुंभार सहा. कार्यक्रम अधिकारी यांनी मानले. याप्रसंगी कु. सई रानमाळे या विद्यार्थीनीने आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन कु. समिक्षा कोले यांनी केले. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना समिती सदस्य प्रा. आर. एस. सोकासने, प्रा.डॉ.पी.एस.चिकोडे, प्रा. ए. एस. साळुंखे, प्रा.ए.ए.कुराडे व रासेयो स्वयंसेवक उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!